Saturday, 22 July 2017

ती (कथा) २



तिने त्या व्यक्तीला न्याहाळले. एकदा स्वतःकडे बघितले : तोंडावर कापड बांधलेलं, आणि अंगभर कपडे. परत एकदा त्या व्यक्तिकडे बघितलं.
अंगावर फाटके कपडे, धुळीने माखलेला चेहरा आणि अस्वच्छ केस, पायात ना चपला होत्या ना हातात काही सामान. पण डोळे.. डोळ्यात तेज भरलेलं. त्या दोन छोट्या चकाकणा-या डोळ्यांमधे मावणार नाहीत एवढी असंख्य स्वप्न. मनातले भाव समोरच्याच्या मनात उमटतील एवढे बोलके डोळे. आणि एक अशी गोष्ट जी त्या फाटक्या अनवाणी मुलीकडे होती पण तिच्याकडे नव्हती - चेहर्‍यावरचे हास्यं.
तिच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ओठांवरच्या हास्याची जागा कपाळावरील आठ्यांनी घेतली होती. पण त्या छोट्या मुलीच्या चेहर्‍यावर मोठं हसू होतं.. ते जे तिच्या मनात उमटलं आणि हळुवार डोळ्यांतून सहज बाहेर पडलं.

Friday, 21 July 2017

ती (कथा) १

ती नेहमी सारखीच बस स्टैंड वर तिच्या बस ची वाट बघत उभी होती. मनात खूप विचार येत होते आणि क्षणार्धात ते जातंही होते. विचारांच्या गर्दीत अडकलेल्या त्या मनाला डोळ्यांनी जणू आदेशंच दिला आणि ते मन अचानक एकाग्र झालं. डोळे एकाच व्यक्तिकडे बघत होते. जणू बाकी काहीच अस्तित्वात नव्हतं आजूबाजूला. फक्त ती आणि ती व्यक्ति. आपल्याकडे कोणीतरी टक्न लावून बघतंय हे जाणवतच ती व्यक्ति चटकन् वळली. एका सेकंदासाठी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. ती व्यक्ति जणू स्वतःच्या भावना डोळ्यांमधून अलगद ओसरू देत होती असा वाटलं तिला.
फक्त एका सेकंदासाठी.
लगेचंच तिने तिचे डोळे खाली घेतले. जणू त्या व्यक्तिच्या नजरेला नजरंच मिळवू नाही शकत आपण असं वाटलं तिला. तेवढ्यात कानावर बस च्या हॉर्न चा आवाज पडला. मनात येणार्‍या विचारांना तिने सारकन् बाजूला सारलं आणि पळत पळत बस मध्ये चढली.. आणि योगायोगंही किती मोठा घडावा.. ती व्यक्ति देखील त्याच बस मध्ये चढली. तिच्या काळजाची धाकधुक वाढली. नकळतंच तिच्या मनात स्वतःची आणि त्या व्यक्तिची तुलना होऊ लागली. तिने त्या व्यक्तिकडे एकदा वळून बघितले. त्या व्यक्तीचे लक्ष बाहेर हॉर्न वाजवणा-या गाडीकडे होते. संधीचा तेवढाच लाभ घेत तिने त्या व्यक्तिला न्याहाळले.

To be continued.